लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह राज्यात मान्यताप्राप्त कंपनीचे रिफ्लेक्टर (परावर्तक) मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, बाजारातील काही कंपन्या सर्वांची दिशाभूल करून रिफ्लेक्टरचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण करीत आहे. अशा कंपन्यांविरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एशियन मॅनेजमेंट सर्व्हिसेस संचालक महेश खेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी विशेषतः रात्री होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे अनिवार्य केले. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम १०४ ते १०४ इ तरतुदी नुसार एआयएस ०८९ व एआयएस ०९० पूर्तता करणाऱ्या तीन कंपन्यांचे रिफ्लेक्टर बाजारात उपलब्ध आहे. यात ओरफेल इंडिया, अवरी डेनियर्स व डाओमिग रिफ्लेक्टिव्ह मटेरियल इंडिया आदी कंपन्यांचे रिफ्लेक्टर उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.