राजगुरुनगरला नव्याने नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. राजगुरूनगर परिषदेचा ९ हजार २१९ रुपये असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. केवळ व्यवसाय परवाना शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रशासनाने हे अंदाजपत्रक बनविले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक बाजू सक्षम राहण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात करवसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणी योजना, शहरातील भुयारी गटार योजना व शहरातील अनेक भागामध्ये रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी (सन २०१९-२०) ला ३० लाख ७२ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावेळी मात्र मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. करोना विषाणू संक्रमण संकट असल्याने उत्पन्न व खर्चावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. आरंभीची शिल्लक १७ कोटी ५२ लाख ०९ हजार ०२७ रुपये, एकूण जमा रक्कम ५१ कोटी २९ लाख ४८ लाख ०९३ रुपये आणि एकूण खर्च ६८ कोटी ८१ लाख ४७ हजार ९०१ रुपये असून ९ हजार २१९ असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या यावर्षीचा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या काही तरतुदी पुढीलप्रमाणे -
* भुयारी गटार योजना - २८ कोटी ०४ लाख ३९ हजार ५५८ रुपये.
* कचरा उचलणे व प्रक्रिया - १ कोटी ९० लाख रुपये.
* नळ कनेक्शन मीटर - ३ कोटी ९५ लाख ०६ हजार ५९३ रुपये.
* रस्ते बांधकाम - ५ कोटी ८७ लाख १५ हजार ५११ रुपये.
* पाणी पुरवठा(एक्सप्रेस फिडर बसवणे) - १ कोटी ८५ लाख रुपये.
* शहरांतर्गत हायमास्ट बसविणे - ३८ लाख ५१ हजार ३१४ रुपये.
* न. पा. इमारत फर्निचर - २० लाख रुपये.
* दिवे आणि विद्युत खांब - ३० लाख रुपये.
* पाणी पट्टी व वीज - ६५ लाख रुपये राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या प्रमुख बाबी पुढील प्रमाणे -
* करापासूनचे उत्पन्न - २ कोटी ८५ लाख १५ हजार रुपये.
* फी पासून उत्पन्न - १० लाख ५६ हजार रुपये.
* बांधकाम परवानग्या - १ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये.
* दस्तऐवज आकार - १४ लाख ९५ हजार रुपये.
* अनुदानापासूनचे उत्पन्न - ४० कोटी ३२ लाख ७८ हजार ५९३ रुपये.