पुणे : शहरातील नागरिकांना विविध सेवा-सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, नागरी प्रश्न आणि विविध तक्रारींची नोंद महापालिकेकडे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून ‘पीएमसी ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते उपलब्ध होणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून नागरिकांच्या ॲपचे अद्ययावत करण्यात येत आहे. या ॲपमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न नोंदविण्यासाठी पीएमसी केअरअंतर्गत ट्विटर, फेसबुक, संकेतस्थळ, कॉल सेंटर, पुणे कनेक्ट ॲप अशी माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना पाणी न येणे, पथदिवे बंद असणे, रस्त्यावर खड्डे पडणे, ड्रेनज चेंबरची झाकण नादुरुस्त असणे, पदपथांवरील अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग यांसह विविध तक्रारींची व नागरी प्रश्नांची नोंद महापालिकेकडे करता येते. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण केले जाते. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर संबंधित तक्रारदारास कळविले जाते.