पुणे : भारतात व महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार दोन महिन्यांपूर्वीच आढळून आला आहे. याला ईजी ५.१ अर्थात ‘एरिस’असे नाव देण्यात आले आहे. मात्र, हा व्हेरियंट धोकादायक नसून त्याने हॉस्पिटलायझेशन वाढत नाही किंवा रुग्णही गंभीर होत नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही, अशी माहिती यातील तज्ज्ञांनी दिली.
बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील जीनोम सिक्वेन्सिंग यंत्रणेमध्ये मे महिन्यात हा उपप्रकार आढळून आला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा विषाणू आढळून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतात रुग्णसंख्या वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता, पण त्याचा कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले की, विषाणूमध्ये सातत्याने म्युटेशन होत असते. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा ‘एरिस’ हा उपप्रकार तीव्र प्रभाव टाकणारा सध्या तरी दिसत नाही. सहव्याधी असलेले रुग्ण, दुर्मीळ आजार असणारे रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना नवीन उपप्रकारांच्या संसर्गाचा जास्त धोका असतो, त्यामुळे या रुग्णांनी काळजी घ्यावी.
राज्यात १७३३ रुग्ण सक्रिय
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या एक्सबीबी १.१६ आणि एक्सबीबी २.३ हे उपप्रकार आढळून येत आहेत. राज्यात आतापर्यंत १.१६ या उपप्रकाराच्या १७३३ रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत (४३), त्यानंतर पुणे (३४) आणि ठाणे (२५) येथे आहेत.
नव्या विषाणूच्या म्युटेशनवर बारकाईने लक्ष
महाराष्ट्रात मे महिन्यात एरिस हा ईजी ५.१ ओमायक्रॉन विषाणूच्या एक्सबीबी १.९ चा उपप्रकार आढळून आला होता. पण त्यामध्ये वाढ झालेली नाही. त्याच्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी प्रसार झालेला नाही. या विषाणूच्या म्युटेशनवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. - डॉ. राजेश कार्यकर्ते, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र, बीजे मेडिकल