पुणे :पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सीएसआर निधीमधून सहाशे ट्रॅफिक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक चौकात एक दोन कर्मचारी वाहतूक नियमन करतील. दिवाळीत नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या चलनांमुळे रस्त्यातच कोंडी होते. ती टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात वाहतूक पोलिस कोणतेही चलन फाडणार नाहीत असे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यात येतील. त्यासाठी मेट्रो किंवा महापालिका ते दुरुस्त करतील. एकमेंकावर चालढकल न करता महापालिकेने हे दुरुस्त केल्यास त्याचा खर्च महामेट्रोकडून वसूल करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना?
पुणे शहरातील वाहतूक कोंडी व रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी ४०० किलोमीटरचे रस्ते नव्याने दुरुस्त करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी ठेवला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून पाऊस संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल. ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करून चालणार आहे तेथे दुरुस्ती आणि जेथे नव्याने रस्ते करावे लागणार आहेत, तेथे नवे रस्ते केले जाणार आहेत. त्यातून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न असेल,” अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.