लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या अनेक परिचारिकांना क्वारंटाईनची सुविधाच उपलब्ध नव्हती. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही परिचारिकांना हक्काच्या सुट्ट्याही मिळाल्या नाहीत. गणेशोत्सव, दिवाळी या सणांदरम्यान त्या ड्युटीवर होत्या. शासकीय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना तर सुट्टीचे वेतनही मिळत नाही. व्यवस्थापनाकडून रजा मंजूर न करणे, एक दिवसा आड काम किंवा सक्तीची रजा, ‘डबल शिफ्ट ड्युटी’ अशा अडचणींचा सामना परिचारिकांना करावा लागला.
कोरोना काळात परिचारिकांना सामोरे जावे लागलेल्या समस्यांमध्ये सुट्ट्या न मिळणे, सुट्टयांमधील वेतनाची कपात याचा प्रामुख्याने समावेश आहे. रुग्ण वाढत गेल्याने परिचारिकांची कमतरता जाणवू लागल्याने बहुतेक शासकीय रुग्णालयात कंत्राटी परिचारिकांची भरती करण्यात आली. तरी परिचारिका मिळणे रुग्णालयांना कठीण गेले.
त्यामुळे उपलब्ध परिचारिकांच्या ड्युटी लावण्याची कसरत करावी लागली. या कालावधीत अनेक परिचारिकांना हक्काच्या सुट्ट्याही मिळाल्या नाही. शासनाकडूनही तसे आदेश देण्यात आले होते. अनेक परिचारिकांनी सुट्टी न घेता सलग चार ते पाच महिने काम केले. सुरूवातीला नायडू रुग्णालयामध्ये रुग्णांना भरती केले जात होते. त्यानंतर पालिकेने कोविड सेंटर सुरू करण्यात आली. तिथे आधीच परिचारिकांची कमतरता असल्याने सुट्टी मिळालीच नाही. हीच स्थिती ससून रुग्णालयासह बहुतेक खासगी रुग्णालयांची होती.
खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिका बाधित झाल्यानंतर विलगीकरणाचा कालावधी त्यांच्या शिल्लक रजेत गृहित धरण्यात आला. वैद्यकीय कारणास्तव रजेवर असलेल्या काही परिचारिकांच्या रजा विनावेतन करण्यात आल्याचे प्रकार ससून रुग्णालयात घडले. तर दुसरीकडे काही नॉन कोविड रुग्णालयांमधील परिचारिकांना सक्तीची रजा किंवा एक दिवसाआड काम करावे लागल्याच्या तक्रारी परिचारिकांनी मांडल्या.
चौकट
साथी संस्थेच्या अभ्यासानुसार ६५ टक्के शासकीय तर ६२ टक्के खासगी रुग्णालयातील परिचारिकांना गरज असतानाही रजा मिळाली नाही. कंत्राटी परिचारिकांनी तर कोणत्याही कारणासाठी सुट्टी घेतल्यास त्यांची वेतन कपात करण्यात आली. अजूनही ही कपात सुरूच आहे. त्यांना अतिरिक्त सुट्ट्या दिल्या जात नसल्याचे एका परिचारिकेने सांगितले.
चौकट
विलगीकरण नाही
नायडूसह महापालिकेची रुग्णालये व कोविड सेंटरमधील परिचारिकांना एक दिवसासाठीही विलगीकरणाची सुविधा देण्यात आली नाही. या परिचारिका साप्ताहिक सुट्टी वगळता दररोज रुग्णालयात येऊन पुन्ही घरी जात आहेत. त्यामुळे कुटूंबाच्या सुरक्षेचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. ससूनमधील क्वारंटाईन कालावधीही कमी करण्यात आल्याचे परिचारिकांनी सांगितले.
---------