पुणे : सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक ३३ मधील कै. मुरलीधर लायगुडे दवाखान्यात मुबलक जागा, सर्व सोयी-सुविधांसह आवश्यक मनुष्यबळ असतानाही येथे सुरू असलेले लसीकरण गेल्या दोन महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे़ मात्र दुसरीकडे याच परिसरात निवडणुकीपूर्वी कोरोना काळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नगरसेवकांकडून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या लसीकरण केंद्रांचे लाड प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहेत़
दरम्यान याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, कै. मुरलीधर लायगुडे दवाखान्यात गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले लसीकरण लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ तर स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनीही याबाबत आरोग्य विभागाशी सतत संपर्क साधून, कै. मुरलीधर लायगुडे दवाखान्यात लसीकरण सुरू करण्याबाबत मागणी केली आहे़ या दवाखान्यात मोठी जागा असल्याने लसीकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांना चांगल्या सेवा देता येतील असेही त्यांनी सांगितले आहे़
महापालिकेच्यावतीने आजमितीला १८८ केंद्राव्दारे शहरात लसीकरण करण्यात येत आहे़ पण काही ठिकाणी ही लसीकरण केंद्र माननीयांच्या हट्टापायी अवघ्या दोनशे तीनशे मिटरच्या अंतरातच उभारण्यात आली आहेत़ तर महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये असतानाही तेथील लसीकरण हलवून, ते तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर वाटप करण्यात आले आहे़ हाच प्रकार सिंहगड रस्त्यावर झाला असून महापालिकेचा दवाखाना सोडून, नागरी सुविधा केंद्र, शाळा, ग्रामपंचायतीचे जुने कार्यालय याठिकाणी लसीकरणाचा खटाटोप करण्यात आला आहे़ अवघ्या दोनशे ते तीनशे मिटर अंतरावरच ही सहा केंद्र असून, महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या आदेशाला येथे पूर्णत: बगल देण्यात आली आहे़ नागरिकांच्या सोयीसाठी एकाच ठिकाणी व जवळ-जवळ लसीकरण केंद्र असू नये, असे त्यांनी स्पष्ट केले होते पण त्याकडे आज दुर्लक्ष होत आहे़
---------------------