मुख्यमंत्री आवाहन करताना पोपटराव पवार यांच्या हिवरे गावाचा उल्लेख करतात. हिवरे गावाचा उंबरा किती... लोकसंख्या किती...भौगोलिक क्षेत्र किती याचा विचार होतोय का? प्रत्येक गावातील सरपंचाला गाव कोरोना मुक्त असावे....व्हावे किंवा करावे याबाबत निश्चितच गांभीर्याने कर्तव्यदक्षतेची जाणीव आहे. परंतु शासन शासनाची जबाबदारी पार पाडत नाही आणि प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मात्र, संसर्ग वाढण्याचे खापर गाव पुढाऱ्यांच्या माथी मारले जाते हे कितपत योग्य आहे याचा गांभीर्याने शासनाने, शासनाच्या अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी विचार करावा आणि मग एखादी संकल्पना राबवण्याचा आग्रह धरावा, असे कांचन यांनी पुढे सांगितले.
उरुळी कांचन हे गाव सुमारे ५० हजार लोकवस्तीचे असून नजीकच्या पाच दहा गावांचा नित्यनियमितपणे या गावाशी संपर्क राहतो. या फ्लोटिंग लोकसंख्येचा विचार करता उरुळी कांचनला दररोज एक लाख लोकसंख्येचा विचार करून त्या पद्धतीने नियोजन करावे लागते. हे करत असताना प्रशासकीय यंत्रणेकडे अनेक वेळा वेगवेगळ्या मागण्या करूनही त्याची पूर्तता होत नाही. एका निर्णयासाठी दहा - पंधरा अधिकाऱ्यांना फोन करावे लागतात. मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. अशी शोकांतिका जर उरुळी कांचन या पुण्याजवळच्या मोठ्या गावाची असेल तर ग्रामीण भागातील इतर खेड्यापाड्यांची काय अवस्था असेल ? याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे. असे मत संतोष कांचन यांनी व्यक्त केले.