इंदापूर : कोणत्याही गावाबाबत गटाचा-तटाचा विचार केला जाणार नाही. माझा तालुका म्हणून इंदापूर तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी, तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये विजयी झालेल्या ६० ग्रामपंचायतींमधील, बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी राज्यमंत्री भरणे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, ज्येष्ठ नेते पांडुरंग मारकड, बाळासाहेब करगळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन खामगळ, वसंतराव आरडे आदी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, प्रत्येक गावात एक राजकीय गट असतात. आपा-आपसात वाद न करता आपले गाव विकासात पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन विकासावर चर्चा होणे गरजेचे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचा विकासात्मक कायापालट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून दाखवणार आहे. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, ग्रामपंचायतीच्या इमारती, रखडलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. गटारी योजना पूर्ण केल्या जातील. गावातील अंतर्गत रस्ते केले जातील. अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
प्रदीप गारटकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात म्हणजेच प्रत्येक गावात अत्यंत मजबूत झाला असून, निवडणुकीच्या जाहीर निकालानंतर कित्येक गावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची निर्माण झालेली आहेत. त्यामुळे गावात विकासासाठी निधी सरकार आपले असल्यामुळे, कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
२४ इंदापूर भरणे
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते डॉ.शशिकांत तरंगे यांच्या पॅनलचा सन्मान केला.