लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील बहुतांश सर्व नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनी आपला अकरावी प्रवेशाचा व्यवस्थापन कोटा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश समितीकडे (सरेंडर) जमा केला आहे. त्यामुळे हवे तेवढे पैसे देऊन प्रवेश घेण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना आता आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतून मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागेल.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही आॅनलाईन पद्धतीने करण्याचे बंधन कनिष्ठ महाविद्यालयांना आहे. मात्र, व्यवस्थापन कोट्यातील मर्यादित जागांसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकप्रतिनिधींकडून शिफारस केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश देणे शक्य झाले नाही, तर त्यावरून वाद निर्माण होतो. त्यामुळे शहरातील बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालयांनी आपला व्यवस्थापन कोटा अकरावी प्रवेश समितीकडे जमा केला आहे. त्यात फर्ग्युसन, बीएमसीसी, एमएमसीसी, गरवारे कॉलेज, वाडिया कॉलेज व स. प. महाविद्यालय यांचा समावेश आहे. दरम्यान, समितीकडे सरेंडर केलेला कोटा महाविद्यालयाला पुन्हा दिला जाणार नाही, असे सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
नामांकित कॉलेजचा व्यवस्थापन कोटा ‘सरेंडर’
By admin | Published: June 30, 2017 4:04 AM