दौंड : मानवी जीवनात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व असून, नामस्मरणाने दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैैव भगवंताचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मत श्रीमती तुलसीजी भार्गव महाराज यांनी व्यक्त केले.
दौंड येथे श्रीयोग वेदांत सेवा समितीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा महोत्सव आयोजित केला आहे. पहिल्याच दिवशी कथा महोत्सवाला मोठी गर्दी होती. आजच्या कथेत ‘श्री गणेशजी-श्री भगवान वेदव्यास दर्शन’ यांचा जिवंत देखावा दाखविण्यात आला. भगवंताच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद असून नामस्मरणाने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. परिणामी मन कायम आनंदी राहत असून, मानवाला सद्बुद्धी प्राप्त होऊन मनुष्य आपले जीवन सफल करू शकतो, असे मत या वेळी तुलसीजी भार्गव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून सवाद्य मंगलकलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर तुलसीजी भार्गव महाराज यांच्या हस्ते श्रीमद्भागवतचे पूजन करण्यात आले. येथील वर्षा मंगल गार्डन कार्यालयात दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जन्म-मरणापासून मुक्त व्हावेतुलसीजी भार्गव महाराज समधुर अमृतमय वाणीतून भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मानवाने सत्प्रवृतीचे नेहमीच आचरण करावे. आयुष्यात ज्ञानोपासना करुन जीवनाचे सार्थक करावे आणि जन्म-मरणापासून मुक्त व्हावे, असा मौल्यवान संदेश या वेळी त्यांनी दिला.