नितीन गायकवाड - पुणे : भटकंतीची आवड असणाऱ्या कोणालाही ''माऊंट एव्हरेस्ट '' चे नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यात गिर्यारोहण प्रांतातला कुणी असेल तर मग विचारता सोय नाही. पण तो सर करायचा म्हटलं तर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर भक्कम तयारी करावी लागते. परंतू, पुण्यातील एका अवलियाने भन्नाट शक्कल लढवत एव्हरेस्ट इतकीच ८८४८ मीटर उंची तब्बल १६ वेळा सिंहगड घाटरस्त्याने अखंडपणे चढून (चालत, पळत) ३२ तास ३० मिनिटे वेळेत ‘एव्हरेस्टिंग’ हा अनोखा उपक्रम सिंहगडावर पूर्ण केला. ४९ वर्षीय आशिष कसोदेकर असे त्या फिनिशरचे नाव.. कसोदेकर यांनी २० फेब्रुवारी २०२० (२०/०२/२०२०) अशा या खास तारखेला काहीतरी जगावेगळे करण्याची ऊर्मी, प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत घेऊन केलेल्या तयारीच्या जोरावर २० फेब्रुवारीला दुपारी २ वाजता सुरू केलेला हा खडतर प्रवास २१ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० वाजता पूर्ण केला. या उपक्रमात त्यांना त्यांचे मित्र हरी, मंगेश, कौस्तुभ यांची मोलाची साथ मिळाल्याचे ते सांगतात. कुठल्याही परिस्थितीत माघार न घेता अशाच स्पेशल तारखांना असे जगावेगळे उपक्रम करण्याची आशिष यांची खासियत आहे. आतापर्यंत त्यांनी ११/११/११ या तारखेला पुणे ते गोवा असा सायकलप्रवास २२ तासांत पूर्ण केला. १२/१२/१२ या दिवशी पुणे ते पाचगणी हा प्रवास चालत २३ तासांत पूर्ण केला आहे तर ११/१२/१३ या तारखेला सुरू केलेला नॉनस्टॉप ३६ तास बाइक चालवत प्रवास पूर्ण केला. त्याचबरोबर ‘ला अल्ट्रा’ लडाखमधील ५५५ किमीची शर्यत १२६ तासांत पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय स्पर्धक आहेत.‘‘जगाचा विचार न करता स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर त्यात यश मिळते’’, असा संदेश ते तरुणाईला देतात. आशिष कसोदेकर यांची या वयातील इच्छाशक्ती आणि उत्साह वाखणण्याजोगा आहे. ते एका ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक असून ते अॅडव्हेंचर टूर्स आयोजित करतात. ..........‘एव्हरेस्टिंग म्हणजे काय?जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे. हे पूर्ण शिखर चढणे म्हणजे एव्हरेस्टिंग. किल्ले सिंहगडची उंची ५६३ मीटर असून आशिष कसोदेकर यांनी १६ वेळा सिंहगड घाटरस्त्याने अखंडपणे चालून-पळून एव्हरेस्टइतकीच ८८४८ ही उंची ३२ तास ३० मिनिटे वेळेत पूर्ण केली.
साडे बत्तीस तासांमध्ये तब्बल सोळा वेळा सिंहगड सर करत केले ' एव्हरेस्टिंग '
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 6:17 PM
जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे. हे पूर्ण शिखर चढणे म्हणजे एव्हरेस्टिंग.
ठळक मुद्देपुण्यातच एव्हरेस्टइतकीच उंची सर करण्याचा उपक्रम