पुणे : छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरच होते. त्यांना धर्मवीर न म्हणणे हे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनात केल्यानंतर भाजपने राज्यभर निर्दशने सुरू केली. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावला.
ते म्हणाले, “संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यास कोणाचाही विरोध नाही, ते स्वराज्यरक्षक आहेतच. मात्र, ते धर्मवीर नाहीत असे म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. हा त्यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचार का सहन करावे लागले?, औरंगजेबाने काय मागणी केली होती? खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात एकही हिंदू उरला नसता. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच.”
शरद पवार यांना आम्ही जाणता राजाच म्हणू, असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणावे. माझे म्हणणे एवढेच आहे की, या देशात एकच जाणते राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचे असेल ते म्हणावे जनता मात्र म्हणणार नाही.”
सध्या अभिनेत्री ऊर्फी जावेदवरून भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात पडू नये असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. त्यावर याचे आपण स्वागतच करतो. मात्र, त्यांचा हा सल्ला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मानला पाहिजे. सुळे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, पण त्यांच्या सल्ल्याचे पालन व्हायला हवे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.