Chetan Tupe: प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:35 IST2024-12-31T10:35:46+5:302024-12-31T10:35:54+5:30
शरद पवार हे सर्वांचे असून, ते आमच्या घरातील व्यक्ती, राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत

Chetan Tupe: प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया
पुणे : लोकनेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकमेकांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राची इच्छा आहे, त्याप्रमाणे ते करतील. प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. या दीड वर्षांच्या कालावधीत माजी केेंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात येण्याचे बऱ्याच वेळा टाळल्याचे पाहण्यास मिळाले. पण १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे अजित पवार यांनी कुटुंबीयांसोबत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चेतन तुपे म्हणाले, मी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचा अध्यक्ष आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांमध्ये येत्या वर्षभराच्या कालावधीत कशा प्रकारे संस्थेचे कामकाज केले पाहिजे, यावर चर्चा झाली. शरद पवार हे सर्वांचे असून, शरद पवार हे आमच्या घरातील व्यक्ती आहेत. राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये. तसेच शरद पवार, माझे वडील स्व. विठ्ठल तुपे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत आलो आहे. मी यांच्याकडून एक शिकलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. राजकारण हा एक महिन्यापुरता विषय असतो. त्यामुळे एक महिन्यापुरते राजकारण करायचे असते, त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावले टाकायची असतात, अशी भूमिका चेतन तुपे यांनी मांडली.