पुणे : ‘बायोपिक’मध्ये चरित्र नायकाला देवत्व बहाल केले जाते आणि पटकथा त्याच्याभोवती फिरत राहते. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन करताना घाणेकरांना माणूस म्हणून प्रेक्षकांसमोर उभे करायचे आणि कोठेही खोटेपणाचा स्पर्शही होऊ द्यायचा नाही, असे ठरविले होते, अशा शब्दांत दिग्दर्शक आणि पटकथाकार अभिजित देशपांडे यांनी काशिनाथ घाणेकर-डॉ. श्रीराम लागू यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला.
‘लोकमत’शी संवादात डॉ. श्रीराम लागू यांनी ‘माझे आणि डॉ. घाणेकर यांचे कधीच वैर नव्हते; आम्ही मित्र होतो. मात्र, आम्हाला एकमेकांची मते पटत होती, असे नाही’, अशी टिपण्णी केली. काशिनाथचा अभिनय प्रेक्षकांच्या आहारी गेलेला होता, असा उल्लेखही ‘लमाण’मध्ये वाचायला मिळतो. याबाबत विचारणा केली असता अभिजित देशपांडे यांनी चित्रपटाचा प्रवास उलगडला. बायोपिक करताना त्याला माहितीपटाचे स्वरूप न येता व्यक्तिरेखा अचूकपणे कशी उभी करता येईल, यामध्ये दिग्दर्शकाचा कस लागतो. चित्रपटामध्ये दाखवलेले काही प्रसंग कोणत्याच पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाहीत. याचा अर्थ ते घडलेच नाहीत, असा होत नाही. गप्पांंमधून, चर्चांमधून अनेक किस्से उलगडत गेले, असेही देशपांडे यांनी सांगितले.दिग्गजांकडून आठवणी, किस्से समजून घेतलेकाही व्यक्ती त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमुळे प्रसिद्ध होतात. डॉ. घाणेकर यांच्यावरील किस्से जास्त लोकप्रिय झाले. घाणेकरांनी एका नाटकादरम्यान दुसऱ्या नाटकातील संवाद म्हटल्याचा किस्सा मला आईने सांगितला होता. त्यानंतर माझ्या विचारांची प्रक्रिया सुरू झाली.मी कांचन घाणेकर, बाळ कुरडतकर, सुरेश खरे, कमलाकर नाडकर्णी अशा अनेक दिग्गजांना भेटलो, किस्से ऐकले, आठवणी समजून घेतल्या. नाथ हा माझा, तोच मी, लमाण अशी पुस्तके वाचली.मी कांचन घाणेकर, बाळ कुरडतकर, सुरेश खरे, कमलाकर नाडकर्णी अशा अनेक दिग्गजांना भेटलो, किस्से ऐकले, आठवणी समजून घेतल्या. या सर्व संशोधनातून घाणेकर उमजत गेले.२०१३ मध्ये मी पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. साधारणपणे आठ-नऊ ड्राफ्ट लिहिले आणि आॅगस्ट २०१७ मध्ये पटकथा लिहून पूर्ण झाली.काशिनाथ, तो अभिनेता नव्हता!‘चित्रपटापूर्वी अभिनेता सुमित राघवन डॉ. श्रीराम लागू यांचा आशीर्वाद घ्यायला गेला होता. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये मी तुमची भूमिका करतो आहे’, असे सांगितल्यावर डॉ. लागू थोडे विचारात पडले आणि म्हणाले, ‘काशिनाथ घाणेकर? तो अभिनेता नव्हता.’ यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच सुमितला कळले नाही, असा किस्सा अभिजित देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.मराठी रंगभूमीचेअनोखे पदर उलगडलेघाणेकरांचा अभिनय अतिरंजित आणि लागूंचा अभिनय वास्तववादी होता. याबाबत डॉ. लागू यांनी ‘लमाण’ मध्येही उल्लेख केला आहे. त्या काळी मराठी रंगभूमी हे एक कुटुंब होते. त्यावेळचे कलाकारांचे संबंध घनिष्ठ होते. कलाकार केवळ सहकारी नव्हे, तर मित्र किंवा शत्रू असत. मराठी रंगभूमीचे पदर खूप अनोखे होते. काशिनाथ-लागू संघर्षाला ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मध्ये कोणतेही वैयक्तिक स्वरूप देण्यात आलेले नाही. त्यांनी दोघांनी माणूस म्हणून कायम एकमेकांचा आदरच केला.