पुणे : तीन खडकवासला भरतील इतकं पाणी गळतीतून वाया जातं, असं कागदोपत्री दाखवण्यात येतं. प्रत्यक्षात मात्र धरणातील पाण्याच्या गळतीऐवजी पाण्याची चोरी जास्त केली जाते, अशी वस्तुस्थिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मांडली. जाणीव जागृती फाउंडेशन व अंघोळीची गोळी आयोजित पाणी या विषायावर कविसंमेलन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी वेलणकर बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. आय. कुंभार, अंघोळीची गोळीचे माधव पाटील, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल मंचावर होते. वेलणकर म्हणाले, ‘‘१८७६मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या खडकवासला धरणातून गळती होत नाही; मात्र आपण बांधलेल्या धरणांमधून गळती होते. राजकारणी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाडी-वाडीत टॅपिंग करून पाणी घेण्यात आले आहे. कागदावर मात्र गळती दाखवली जाते. एका बांधकाम व्यवसायिकाला धरणाच्या पाण्याच्या गळतीतून पाणी आपल्या बांधकामासाठी वापरण्याची अजब परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. परिसंवादाआधी तरुणांनी कवितांमधून पाणीप्रश्नावर प्रकाश टाकला. कुमार रुक्मिणी गोरक्षनाथ, हनुमंत चांदगुडे, अशोक देशमाने, स्वाती कांबळे, श्रीरंजन आवटे, अभिषेक, सागर काकडे यांनी कविता सादर केल्या. अंकुश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
पाण्याची गळती नव्हे, तर होतेय चोरी
By admin | Published: April 25, 2017 4:18 AM