पुणे : निवडणुकीत मोदींना पाडा असे सांगितले पण कुणाला आणा हे मात्र सांगितले नाही. पुरोगामी मध्यमवर्गीयांमध्ये बुद्धीवादी की कार्यकर्ता? हा घोळ कायम राहिला. विरोधक आपली नीती जनसामान्यांमध्ये रूजविण्यात अपयशी ठरले ही वस्तुस्थिती आहे. भाजपला मतदारांनी बहुमतात निवडून दिले याचा अर्थ भारताने हिंदू राष्ट्रनिर्मितीला दिलेला कौल आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत विविध पक्षांच्या विचारवंतांनी निवडणुकीच्या निकालाबाबत तात्विक विवेचन केले. पुरूष उवाच मासिक अभ्यासवर्गाच्या वतीने ‘निवडणूक निकालाचं विश्लेषण आणि पुढची दिशा’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. त्यामध्ये प्रा. भाऊसाहेब आजबे, प्रा. अंजली मायदेव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लता भिसे आणि युवक कॉंग्रेसचे हणमंत पवार सहभागी झाले होते. प्रा. भाऊसाहेब आजबे यांनी निवडणूकीत कॉंग्रेसला दोष देऊन उपयोग नाही. तर संपूर्ण यंत्रणाच अपयशी ठरली असल्याकडे लक्ष वेधले. डॉ. अंजली मायदेव म्हणाल्या, 2014 पासून भाजपने मतदारांपर्यंत आपले म्हणणे पोहोचविण्याची पद्धत टप्प्याटप्प्प्याने बदलली. शेवटच्या टप्प्यात साध्वी प्रज्ञा सिंहला उमेदवारी देऊन आपल्याला देश कोणत्या ठिकाणी घेऊन जायचा आहे ते जवळपास स्पष्ट केले. भाजपला बहुमताने निवडून देत भारताच्या मतदाराने हिंदू राष्ट्रनिर्मितीला दिलेला हा कौल आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे. यंदाच्या निवडणूकीत निवडणूक आयोग हा हारलेला एलिमेंट राहिला. जेव्हा आयोगासारखी कोणतीही यंत्रणा ऑब्जेक्टिव्हली वागत नाहीत आणि सत्ताधा-यांच्या बाजूने जाते तेव्हा चित्र चिंताजनक असते. या सर्व बाजूंचा विचार केला तर आज झोकून देऊन काम करणाऱ्या कँडर बेस कार्यकर्त्यांची सर्वच पक्षांना गरज आहे. हणमंत पवार यांनी काँग्रेस कुठं चुकलं? याचं उत्तमप्रकारे विश्लेषण केलं. काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती पण त्यांनी केवळ ती उपभोगली. यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते थेट मतांची खुडणी करायला गेले. मात्र मधल्या काही काळात बीजं कुणीतरी दुस-याने पेरून मशागत केली होती. यापुढील काळात काँग्रेसला सातत्याने पेरणी करावी लागणार आहे. राहुल गांधी हिंसा करणार नाही. तो एक स्वच्छ प्रतिमेचा आधुनिक नेता आहे. द्वेषाच्या राजकारणाला तो कधीच बळी पडणार नाही. त्यामुळे काँग्रेसला मरण नाही. राहुल गांधी म्हणायचे ही सोच की लढाई आहे. आपलं संचित आपल्याला सांगता येत नाही. ही दुर्देवाची बाब आहे. काँग्रेसच्या अपयशाची चुकीची कारणे शोधत आहोत का? हा प्रश्न आहे. सध्या काँग्रेसचा एक कदम स्वच्छता की और सुरू आहे. राहुलला काही लोक काँग्रेसमध्ये नको आहेत. नवीन काँग्रेस उभा करण्याची मोहीम हाती घेतली जात आहे.आपला बूथ आधी समजून घेतला पाहिजे याबाबत प्रशिक्षण सुरू झाले आहे. लता भिसे म्हणाल्या, तरुण पिढीसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैचारिक फळी तयार केली. समाजात फॅसिस्ट विचार पेरले. सत्तेत असताना भाजपने गांधी नेहरूंची टवाळी सुरू केली. नेहरूंनी देशाचे कसे वाटोळे केले? यावर अनेक विचारवंतानी लेखातून चांगली मांडणी केली ही वैचारिक लढाई काँग्रेसने करायला हवी होती मात्र तसे झाले नाही. सावित्रीबाई फुले याना शिक्षिका संबोधून भगवेकरण केले. भाजप संस्कृती हुल्लडबाजी आणि मर्दांगीचे प्रतीक ठरत आहे. डावे पक्ष आणि लोकशाही ची एकजूट होणे आवश्यक आहे.
...हा हिंदू राष्ट्रनिर्मितीला दिलेला कौल तर नव्हे? विचारवंतांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 12:26 PM
विरोधक आपली नीती जनसामान्यांमध्ये रूजविण्यात अपयशी ठरले ही वस्तुस्थिती आहे
ठळक मुद्देपुरोगामी मध्यमवर्गीयांमध्ये बुद्धीवादी की कार्यकर्ता? हा घोळ कायम