भावना गवळी, अजित पवार मराठी नाहीत का? 'तरीही कारवाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:15 PM2021-10-30T15:15:06+5:302021-10-30T19:05:16+5:30
भावना गवळी या देखील मराठाच आहेत, पाच वेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का ? तिचा छळ सुरू असताना कोणी आवाज उठवत नाही....
पुणे: महाराष्ट्रात सगळेच मराठी आहेत, क्रांती रेडकर (kranti redkar) मराठी आहेत, तिचे पती एनसीबीमध्ये अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्रात दिसत असलेलं चित्र व्यक्तिगत नाही. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने काहीतरी चूक केली असा लोकांचा समज आहे. ही लढाई त्यांच्याविरुद्ध सुरू आहे. क्रांती रेडकर सोबतची वैयक्तिक लढाई नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) पुण्यात म्हणाले. सध्या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येऊन आमच्या लोकांचा छळ करतेय. महाराष्ट्राला बदनाम करत आहे. आमच्या मंत्र्यांच्या इतर लोकांच्या घरावर धाडी टाकत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
भावना गवळी या देखील मराठाच आहेत, पाच वेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का ? तिचा छळ सुरू असताना कोणी आवाज उठवत नाही. अजित पवारांचे नातेवाईक, त्यांच्या बहिणी मराठी नाहीत का? देगलूरची निवडणूक सुरू असताना तुम्हाला अशोक चव्हाणांच्या लोकांवर धाडी टाकण्याची बुद्धी सुचते? ते मराठी नाहीत का? अनिल परब मराठी नाहीत? राज्यात सगळेच मराठी आहेत. त्यांचं रक्षण करणं, त्यांची प्रतिष्ठा सांभाळणं या सरकारचं काम आहे आणि आम्ही ते करतोय.
भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. हा त्या पक्षाचा दावा आहे, त्यामुळे जगातला सर्वात मोठा पक्ष सत्तेतून पायउतार झाला तरी त्या पक्षाचं अस्तित्व तर राहणारच. तो प्रमुख विरोधी पक्ष असेल. महाराष्ट्रातील या पक्षाची ताकद आहे. 105 आमदार असतानाही सत्ता नाही पण ताकद आहे. ते दाखवत नाहीत हा भाग वेगळा, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ताकद राहील. देशाचा राजकारणातून पुढील काही दशकं राहणारच, असंही राऊत म्हणाले
पुढे बोलताना राऊत म्हणाले नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आणले ते जर खरे असतील तर हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात आणखी एक इंटरव्हल व्हायचा आहे. नवाब मलिक ते लवकरच करतील.