पुणे : लॉक डाऊनच्या काळात कोकणातील रोहा येथे ८० वर्षाच्या वृद्ध महिलेसाठी अतिशय महत्वाचे असलेले औषध मिळत नव्हते. तेव्हा डेक्कन पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे थेट रोह्यामध्ये हे औषध पाठविणे शक्य झाले आहे.
अशा कठीण प्रसंगी वेळेवर मदत केल्याबद्दल पुण्यातील चाटर्ड अकाऊंटंट अनिल धारप यांनी डेक्कन पोलिसांचे आभार मानले आहेत. धारप यांची आई सुधा धारप (वय ८०) या रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहतात. त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आलेली औषधांचा साठा ८ दिवसाइतका होता, पण लॉक डाऊनमुळे रोहा येथे ही औषधे मिळत नव्हती. त्यामुळे ही औषधे रोहा येथे पोहचविण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती अनिल धारप यांनी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना केली. त्यांनी तुम्हाला औषध देण्यासाठी पाठविणे शक्य होणार नाही. पण काय करता येईल, हे पहातो असे सांगितले. त्यानंतर लगड यांनी चौकशी केल्यावर पुण्यातील निरगुडकर यांना तातडीच्या कामासाठी महाड येथे जायचे होते. त्यांनी रोहा येथे धारप यांच्या आईची औषधे पोहचवायची या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली. धारप यांनी ही औषधे निरगुडकर यांच्याकडे सोपविली. त्यानंतर ती घेऊन निरगुडकर हे आज कोकणात गेले असून धारप यांच्या आईला पोहचवणार आहेत़ यामुळे धारप यांनी एकट्याने प्रवास करण्याचा प्रसंग टळला व त्यांच्या आईपर्यंतही आवश्यक ती औषधे पोहचणार असल्याने त्यांच्या जीवाचा धोकाही टळणार आहे.