यवत ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये सरपंच समीर दोरगे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांची भेट घेऊन गावातील कोरोना रुग्णांबाबत माहिती घेतली. यावेळी डॉ. अजित गांधी, उद्योजक संदीप दोरगे आदी उपस्थित होते. यावेळी यापुढील काळात गावात करण्याच्या उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.
यवत मध्ये सद्य परिस्थितीत एकूण ६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गावात जनता कर्फ्यू सुरू करण्याच्या आगोदर सरासरी १५० ॲक्टिव्ह रुग्ण होते. अजूनपर्यंत गावात २५ पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जिल्हाधिकारी यांनी यवतला कोरोनाचा रेड झोन म्हणून घोषित केले होते. यानंतर गावातील ग्राम स्तरीय समितीने बैठक घेऊन १४ दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. गावात कडक निर्बंध लागू केल्यानंतर काहीच दिवसात रोज वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात आली. आता १२ दिवस उलटल्यानंतर एखादा रुग्ण आढळून येत आहे. मागील तीन दिवसात गावात एकही नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आलेला नाही.
गावातील जनता कर्फ्यू बुधवार (दि. २६) रोजी संपणार असून त्यानंतर राज्य शासनाच्या नियमांनुसार व मा. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या निर्बंधानुसार गावात बाजार पेठेतील जीवन आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडली जाणार आहेत.
आज (दि.२४) रोजी संत तुकाराम महाराज पालखी तळ येथे अत्यावश्यक सेवेतील ७० व्यापारी व कर्मचारी यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. बुधवार पासून दुकाने सुरू होणार असली तरी व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करून कोरोनाला रोखावे असे आवाहन सरपंच समीर दोरगे यांनी केले आहे.
-
यवत ग्रामस्तरीय समिती व ग्रामपंचायत यांनी जनता कर्फ्यूचा घेतलेला निर्णय यामुळे गावातील कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. आता शासनाने गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी वेळेत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आरोग्य विभागाकडे करणार असल्याचे देखील यावेळी सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांच्याशी यवतमधील कोरोना साथ नियंत्रणबाबत चर्चा करताना सरपंच समीर दोरगे, डॉ.अजित गांधी, संदीप दोरगे