लोणी काळभोर : प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव ( ता. हवेली) येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जोग सेंटर, वाकडेवाडी पुणे-२चे उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद दिगंबर गंधे (वय ४७, रा. न्यू अजंठा हौसिंग सोसायटी, कोथरूड, पौड रोड, पुणे ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे - २चे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने परिसरात वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेल्या होत्या. याची शहनिशा करून कंपनी व परिसराची पाहणी करून तक्रारीनुसार प्रदूषण होत असेल तर योग्य ती कारवाई करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे लेखी व तोंडी आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याने उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे व क्षेत्र अधिकारी प्रकाश भास्कर जाधव हे दोघे २१ डिसेंबर रोजी पाहणी करण्यासाठी कंपनी परिसरात आले होते.दुपारी ३ ते ६ या कालावधीत झालेल्या पाहणीत त्यांना कंपनीतून सिमेंटच्या गोण्या भरून बाहेर पडलेल्या वाहनांपैकी काही वाहनांतील सिमेंटच्या गोण्या ताडपत्रीने झाकल्याचे दिसून आले नाही. येथून मालवाहतूक करणारी वाहनांची ये-जा मुख्यत्वेकरूण कोरेगावमूळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाकडे होत असते. ही वाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ रस्त्यालगतच्या झाडांवर, शेतांतील पिकांवर तसेच परिसरांत उडून पडल्याचे स्थळपाहणीत निदर्शनास आले. कंपनीच्या वतीने मालवाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ परिसरात उडून स्थानिक नागरिकांसह इतरांना प्रदूषणाचा उपद्रव होवू नये म्हणून रस्त्यावर कंपनीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत टँकरने पाणी मारल्याचे निदर्शनास आले. परंतू त्यापुढील सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर पाणी मारण्यात न आल्याने त्या परिसरात प्रदूषणाचा उपद्रव होत असल्याचे दिसून आले.या सर्व बाबींचा विचार करता कंपनीने आपल्या मालाची वाहतूक करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आल्याने पेठ-नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ व पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रणाबाबत खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील सिमेंट कंपनीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:55 PM
प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली तक्रारअल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल