केंद्रीय मंत्री जावडेकर : डॉ. सायरस पूनावाला शाळा नामकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अटल लॅब, हॅकथॉनसारखे उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षणातून समस्या सांगणारे नव्हे तर उपाय शोधणारे विद्यार्थी घडवायचे आहेत. त्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. जगापासून वेगळे होण्यासाठी आत्मनिर्भर मोहीम राबविली जात नसून जगाचे नेतृत्व करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी (दि. २३) केले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेचे ‘डॉ. सायरस पूनावाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज’ आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’च्या नामकरण प्रसंगी डॉ. जावडेकर बोलत होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम राजोरे, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार उदय पुंडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य सुभाष अगरवाल, आय. एस. मुल्ला, डॉ. मिलिंद तेलंग आदी यावेळी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की, कोरोनावरच्या लसीला जगभरात मागणी असल्याने सायरस पूनावाला यांची ओळख ‘व्हॅक्सिन पूनावाला’ अशी झाली आहे. कोरोनावर औषध शोधता आल्याने व्हॅक्सिन लिडरशीपमुळे ‘आत्मनिर्भर भारत’साठी मोठी मदत झाली. शिक्षण संस्थांना मदत करून ते समाजाच्या विकासासाठी मोठी ऊर्जा निर्माण करत आहेत.
डॉ. सायरस पूनावाला म्हणाले की, सद्यस्थितीत कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता असून ‘सिरम इन्स्टिट्यूट’कडून अनेक शिक्षण संस्थांना आर्थिक मदत केली जात आहे. केंद्र शासनाने सर्वांना कोरोनावील लस देण्यास परवानगी दिल्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील सर्वांना मोफत लस दिली जाईल. गौरी प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या दुर्गा देशमुख यांनी आभार मानले.