मुख्यमंत्री नव्हे, ते छायाचित्र कामगार नेते बाबा कांबळे यांचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:01 PM2022-07-30T12:01:23+5:302022-07-30T12:03:17+5:30
कांबळे यांचे तरुण वयातील रिक्षासह छायाचित्र व्हायरल...
पिंपरी : ‘‘राजकारणात मिरवतोय रिक्षावाला’’ ही बातमी ‘लोकमत’च्या पिंपरी- चिंचवड हॅलोमध्ये रविवारी (दि. २४) प्रसिद्ध झाली. त्यात पिंपरी- चिंचवड औद्योगिक नगरीतील कष्टकरी व रिक्षा पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांचे तरुण वयातील रिक्षासह छायाचित्र प्रसिद्ध झाले. मात्र, हे छायाचित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘‘हे छायाचित्र मुख्यमंत्र्यांचे नसून, तरुण वयातील माझे आहे’’, असे बाबा कांबळे यांनी सांगितले. दुसरीकडे व्हायरल सत्य जाणून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांबळे यांच्याशी संवाद साधला. पवार यांनी कांबळे यांना चांगले काम करण्याच्या शुभेच्छाही दिल्या.
राज्यात राजकीय भूकंप होऊन नवीन सरकार स्थापन झाले. त्यात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. शिंदे यांनी एकेकाळी रिक्षा चालविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील एकेकाळी रिक्षा चालवून विविध राजकारण, समाजकारणात मोठे झालेल्या यशस्वी मान्यवरांचे ‘‘राजकारणात मिरवतोय रिक्षावाला’’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्याचे वेगवेगळ्या स्तरातून कौतुक झाले. त्यात पिंपरी-चिंचवडमधील बाबा कांबळे यांचे छायाचित्र होते. कांबळे यांचे छायाचित्र मुख्यमंत्र्यांशी मिळते-जुळते असल्याने सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने व्हायरल झाले. त्यामुळे कांबळे यांना राज्यातील विविध भागातून फोन येऊ लागले. त्याचा मानसिक त्रास कांबळे यांना झाला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे छायाचित्र पाहून फोन केला व माहिती मागवून घेतली. पवार म्हणाले, ‘‘बाबा, तो फोटो तुझा आहे का, सोशल मीडियावर शिंदे साहेबांचा फोटाे आहे, असं सांगितले जातेय. याबाबत छगन भुजबळ साहेबांचा फोन आला होता.’’ त्यानंतर कांबळे यांनी पवार यांना छायाचित्राची कथा सांगितली.
छायाचित्र प्रसारित होण्याचा प्रकार गैरसमजुतीतून समाजमाध्यमांवरील अतिउत्साही मंडळींमुळे झाला आहे. हे माझे छायाचित्र १९९७चे आहे, तेव्हा मला दाढी होती. श्रावणातील पूजा होती, त्यावेळी घेतलेले हे छायाचित्र आहे. या छायाचित्राचा संबंध मुख्यमंत्र्यांशी जोडला गेल्याने घोळ झाला. मला दिवसाला शंभर दूरध्वनी येत होते. अखेर उलगडा झाल्याने सारे काही थांबले. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मला दूरध्वनी केला. त्यांनी विचारले. ‘‘फोटो तुझा आहे का?’’ त्यांना मी सगळी हकीकत सांगितली. त्यांनी माझे कौतुक केले. चांगले काम करत राहा, अशा शुभेच्छा दिल्या.
- बाबा कांबळे, (कष्टकरी व रिक्षा पंचायतीचे नेते)