लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिसरी लाट लहान मुलांना बाधीत करेल, असे सांगण्यात येत आहे. ते टाळायचे असेल तर साथ रोग नियंत्रणात महत्वाची असेलेली ड्रॉप लेट इन्फेक्शन हा उपाय अंमलात आणावा, असे आवाहन रेल्वे रुग्णालयातून मुख्य परिचारिका म्हणून निवृत झालेल्या शिला आढाव यांनी केले आहे.
ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या शिला या पत्नी. रेल्वे रुग्णालयात त्या मुख्य परिचारिका होत्या. साथ रोग नियंत्रणाचा त्यांना अनुभव आहे. त्या म्हणाल्या, तिसऱ्या लाटेने धास्तावून जाऊ नका. वैद्यकीय परिभाषेत ज्याला ड्रॉप लेट इन्फेक्शन म्हणतात ते अंमलात आणायला हवे. यात संपूर्ण घर निर्जंतुक करतात. नवरात्र किंवा दिवाळी, गणपतीत आपण घरातील प्रत्येक कपडा स्वच्छ करतो. तसाच हा प्रकार आहे.
मास्क, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे हे उपाय तर करायलाच हवे, पण त्यातून स्वच्छतेचे वर्तुळ पूर्ण होत नाही. त्यासाठी घरातील चादरी, उशांचे कव्हर, गोधड्या, ब्लांकेट्स, पांघरुणे इत्यादी ‘थुंकी’ संपर्क होणारे कपडे वारंवार धुतले गेले पाहिजे. लोकरी कपडे, गाद्या यांना ऊन दिले गेले पाहिजे. या कपड्यांवर जंतूनाशकाची फवारणी केली पाहिजे असे आढाव यांनी सांगितले. शहराची पालक संस्था म्हणून महापालिकेनेही सरसकट घरसफाई, परिसर सफाई, निर्जंतुक फवारणी मोहीम सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.