पुणे :कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपूर्वीच सुरु झाला आहे अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केली आहे. त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. हे जरी चिंतेचे असले तरी कोण काय करणार अशा शब्दात त्यांनी आपली अगतिकता व्यक्त केली. ते पुण्यात 'एबी आणि सीडी'च्या या त्यांच्या त्यांचा आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आले होते.
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या मुद्दयावर गोखले यांना विचारले असता त्यांनीही कला क्षेत्रात जातीयवादाचे विष पसरवले जात असल्याचे मान्य केले.
ते म्हणाले की, 'कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु झाला आहे आणि त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. जातीयवादाचे विष कला क्षेत्रातही पसरवले जाते मात्र त्यावर लिहिण्याची किंवा भाष्य करण्याची कोणाचीही हिंमत नाही.हे जरी चिंतेचे असले तरी आपण असेच आहोत आणि आहे ते स्वीकारावे लागेल असेही त्यांनी म्हटले.