पुणे : शहरात डेंग्यूच्या डासाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या १ हजार ६६१ जणांना तथा आस्थापनांना, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावून ही डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ १ जानेवारी ते २६ ऑगस्टपर्यंत शहरात एकूण २०३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत़
शहरात जुलै व ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे दर महिन्याला ८६ रुग्ण आढळून आले आहेत़ जानेवारी, २०२१ मध्ये ही संख्या २२ होती, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ६, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १ व मे जूनमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आला नाही़ मात्र, पावसाळा सुरू झाल्यावर शहरातील काही भागातील इमारतींच्या पार्किंगमध्ये, टेरेसवर, टाक्यांमध्ये तथा अन्य रिकाम्या जागेत पाणी साचून राहिल्याने डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढले़. परिणामी शहरातील डेंग्यूच्या रुग्णातही वाढ दिसून आली़
जानेवारी, २०२१ पासून २६ ऑगस्ट, २०२१ पर्यंत शहरात १ हजार ६२४ जणांना डेंग्यूची लक्षणे आढळून आली़ परंतु, तपासणीअंती यापैकी २०३ जणांनाच प्रत्यक्षात डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले आहे़ डेंग्यूबरोबर शहरात जुलै महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्णही अधिक आढळून आले असून, ही संख्या ७३ इतकी आहे़ तर जानेवारी, २०२१ पासूनची ही एकूण संख्या ८४ आहे़
चौकट
१ लाख २३ हजार ८५० रुपये दंड वसूल
डेंग्यू उत्पत्तीला कारण ठरलेल्या भागांवर महापालिकेने लक्ष केंद्रित करून, त्यांना आजपर्यंत १ हजार ६६१ नोटीस दिल्या आहेत़ नोटीस देऊनही परिसरातील पाणी काढून तो स्वच्छ न केल्याप्रकरणी जानेवारीपासून आजपर्यंत महापालिकेने संबंधितांना १ लाख २३ हजार ८५० रुपये दंड ठोठावला असल्याची माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सर्व भागात औषध फवारणी करून योग्य खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना फलकांव्दारे शहरातील मोठ्या सोसायट्या, मॉल, ऑफिसमध्ये लावल्या आहेत़