पुणे : रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर पालिकेच्या मिळकत कर विभागात नोटांचा जोरदार भरणा होत असताना स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाच्या कार्यालयाला मात्र नोटिसा बजावण्याची वेळ आली आहे. मागील ३ वर्षांत नियमानुसार विवरणपत्र सादर न करणाऱ्या तब्बल ४० हजार व्यापाऱ्यांना या विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. विक्रीकर विभागाकडून त्यांच्या वार्षिक उलाढालीची माहितीही मागविण्यात आली आहे.प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे दंडही ठोठावण्यात आल्याचे एलबीटी विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने एलबीटीची मर्यादा शिथिल केली, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आर्थिक विवरणपत्र पालिकेकडे सादर करणे टाळले. महापालिकेने सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ या तिन्ही आर्थिक वर्षात विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती एकत्र केली असून, अशा सर्वांना नुकतीच दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. कर जमा करण्यासाठी रद्द झालेल्या १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर झाल्यामुळे एलबीटी विभागाकडूनही या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत, असे मोळक यांनी सांगितले.
पालिकेच्या ४० हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
By admin | Published: November 17, 2016 4:45 AM