दौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीतील घाणीच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान ५ जुलै २0१६ रोजी नोटीसधारकांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र शासन, दौंड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे, तत्कालीन आरोग्य अधिकारी भानुदास भापकर, सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी ए. के. दुबे, रेल्वेचे अधिकारी सुमीत कुमार, रेल्वे रुग्णालयाचे डॉ. एन. के. सजीव, सेंट्रल रेल्वेचे आरोग्य अधिकारी डी. एन. जोशी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. दौंडच्या रेल्वे कुरकुंभ मोरीत सातत्याने गटारीतील सांडपाणी साचलेले असते तेव्हा या सांडपाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येते. तर बऱ्याचदा रेल्वे कुरकुंभ मोरीतून जाताना पादचारी, वाहनचालकांना याचा उपद्रव होतो. तसेच पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तेव्हा कुरकुंभ मोरीत पाणी साचले जाते. मात्र या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते आणि सांडपाण्याचा आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा कुरकुंभ मोरीतील सांडपाणी काढणे ही रेल्वेची जबाबदारी नाही, नगर परिषद म्हणते आमची जबाबदारी नाही, मग नेमके या सांडपाण्याला वाली कोण? असा प्रश्न भेडसावत असल्याने जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात अॅड. अजित बलदोटा यांनी दौंड न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा फौजदारी अर्ज नामंजूर करण्यात आला. याकामी अॅड. विलास बर्वे, अॅड. सचिन साने यांनी काम पाहिले होते.(वार्ताहर)उच्च न्यायालयात याचिका दाखलफौजदारी अर्ज नामंजूर झाल्याने यासंदर्भात न्याय मागण्यासाठी अॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होऊन वरील व्यक्तींवर नोटिसा काढून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याकामी अॅड. अविनाश आव्हाड यांनी कामकाज पाहिले.
सांडपाण्याच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा
By admin | Published: June 12, 2016 5:56 AM