लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम फेडून कंपनीने ना हरकत दाखला दिला. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा कर्ज असल्याचे कर्जदाराला नोटीस देऊन मॅगमा फायनान्स कंपनीने फसवणूक केली.मुरूम येथील विजय बबन गोफणे यांच्याबाबत वरील प्रकार घडला आहे. सन २०१३मध्ये गोफणे यांनी व्यवसायासाठी जुना जेसीबी (एमएच १२/जेके ०२५५) घेतला होता. गोफणे यांनी ३५ हजार रुपयांचे तीन हप्ते भरले होते; परंतु जेसीबीला काही काम न मिळाल्याने आणि गोफणे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पुढील हप्ते भरू न शकल्याने मॅगमा फायनान्सने जेसीबी ओढून नेला. या जेसीबीचा या फायनान्स कंपनीने लिलाव करून तो जुबेर गुल खान (औरंगाबाद) यांना विकला व तशा सह्या बारामती उपप्रादेशिक कार्यालयात केल्या. उपप्रादेशिक कार्यालयाने औरंगाबाद आरटीओ कार्यालयाला ना हरकत दाखला दिला. सध्या सदर वाहन हे जुबेर गुल खान यांच्या नावावर आहे. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर गोफणे यांना मॅगमा फायनान्स कंपनीने ना हरकत दाखला दिला. या घटनेला आता दोन वर्षे झाली असताना मागील महिन्यात गोफणे यांना मॅगमा कंपनीने वडगाव पोलिसांच्या नावे अटक वॉरंट नोटीस पाठविली. वडगाव पोलिसांनी गोफणे यांना अटक करण्याची धमकी देऊन एका राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून १० हजार रुपये लाटल्याची चर्चा आहे. वास्तविक, ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर कर्जदार व कंपनी यांचा संबंध राहत नाही. असे असूनही २ वर्षांनंतर कर्ज बाकी असल्याचे कारण देऊन गोफणे यांना त्रास दिला आहे.
ना हरकत दाखला देऊनही कर्जदाराला नोटीस
By admin | Published: May 13, 2017 4:23 AM