या अनधिकृत कामाबाबत आपण कोणत्या विभागातून परवानगी घेतली असेल, तर त्याची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी. गायरान हद्द गट क्र.०८९२ मध्ये केलेल्या विद्युत पुरवठा लाईन पुढील २ दिवसात त्वरित काढून टाकावी आणि कशाच्या आधारे आपण विजेचे खांब टाकून विद्युत पुरवठा लाईनचे काम करीत आहात त्याचा लेखी खुलासा व शासकीय परवानगी ग्रामपंचायतीमध्ये सादर करावी.अन्यथा, आपल्या धारिवाल इंडस्ट्रीज कंपनीवर कारवाई करण्यात येईल अशा विषयाची लेखी नोटीस वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीने धारिवाल इंडस्ट्रीज व संबंधित विद्युत पुरवठा वीजवहिनी लाईन कामाचे कंत्राटदार स्वप्निल तानाजी धुमाळ यांना दिली आहे.
धारिवाल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने विद्युत पुरवठा लाईन काम गेले अनेक दिवस चालू आहे. परंतु या लाईनचे काम मागील काळात वाडेगाव-वाडेफाटा रस्त्यालगत असलेल्या वन खात्याच्या जागेतून अनधिकृत बेकायदेशीरपणे सुरू होते. याबाबत अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल गावडे यांनी संबंधित वनखात्याकडे हे काम बेकायदेशीरपणे चालू असलेबाबत तक्रार केली होती. त्याला अनुसरून वनखात्याने त्वरित गावडे यांच्या तक्रारीची दखल घेत वन खात्याच्या जागेतून बऱ्याच अंतरावर लोखंडी पोल उभारून नेलेल्या लाईनचे काम त्वरित थांबवून संपूर्ण पोल काढून लाईन काढावी अशा सूचना देताच संबंधित कंत्राटदार यांनी ती वनखात्याच्या जागेतून जाणारी विद्युत पुरवठा लाईन त्वरित काढून टाकली.
मात्र, दरम्यान पुन्हा हे विद्युत पुरवठा लाईनचे काम धारिवाल इंडस्ट्रीज या कंपनी संबंधित कंत्राटदार यांच्या मार्फत अनाधिकृत गायरान जागेतून सुरू केले असून तसेच साधू वासवानी यांच्या संरक्षण भीतीला लागून असलेल्या वन खात्याच्या जागेच्या सीमेवर नेण्याचे काम चालू केले आहे. हे काम नेमके साधू वासवानी यांच्या खासगी जागेतून चालू आहे का? नेमके वन खात्याच्या जागी चालू, याबाबत मात्र संभ्रम आहे. याची संबंधित वाडेबोल्हाई वन खात्याचे वनरक्षक रुपाली जगताप यांनी पाहणी करून हे काम थांबविले आहे व त्याची माहिती वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे.
--
कोट
या प्रकरणाची पूर्णतः चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा, वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आंदोलन करू.
-अमोल गावडे, उपाध्यक्ष - अ.भा.माहिती सेवा समिती, महाराष्ट्र प्रदेश
--
फोटो : १५ पिंपरी सांडस खासगी वीज वाहिनी
छायाचित्र ओळ:-वाडेगाव-वाडेफाटा रस्त्यालगत असलेल्या शासकीय गायरान जागेत अनधिकृपणे उभारलेले विद्युत पुरवठा लाईन लोखंडी पोल.