पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणून जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी पाटील पत्रकारांशी बोलत होते. कार्यक्रमास लीला पूनावाला फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पूनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, बाबूराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, डॉ. शाम राजोरे, डॉ. मिलिंद तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अॅड. भगवान बेंद्रे, जवाहरलाल बोथरा, शशिकांत पवार, दिलीप गिरमकर, दुर्गा देशमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘केंद्र शासनाविरुद्ध बोलणाऱ्यांना बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. परंतु, त्यातून काहीही साध्य होणार नाही.महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माधमातून दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले. त्यामुळे यात तथ्य असणारच. तसेच मिशन संपल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर पाटील म्हणाले, त्यांच्याविषयी मी शक्यतो काही बोलत नाही.
दरम्यान, कॅम्प एज्युकेशन सोसायटीने काळाची गरज ओळखून नव्या पिढीला स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण देण्याचे पाऊल उचलले असून संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील परदेशी भाषा, बेकरी उत्पादन, स्पा यांसारख्या अभ्यासक्रमांमुळे युवकांना सक्षमपणे स्वयंरोजगार सुरू करता येतील, असे गौरवोद्गार पाटील काढले.
संचेती म्हणाले, डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून सर्व स्तरांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाणार आहे.
गौरी प्रभुणे यांनी सूत्रसंचालन, तर दुर्गा देशमुख यांनी आभार मानले.