सिंहगड रस्ता : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बिल्डर्स, राजकारणी नेते व लँड माफियांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत माजी केंद्रीय मंत्री तसेच पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्यांना पाटबंधारे विभाने नोटीस पाठवली आहे.खडकवासला, सिंहगड, पानशेत या पर्यटनस्थळांमुळे धरणाच्य पाणलोट क्षेत्रातील जागांवर धनिकांच्या नजरा पडल्या आहेत. विविध क्लृप्त्या लढवून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या परिसरातील जागा बळकावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. गोऱ्हे खुर्द , गोऱ्हे बुद्रुक, कुडजे, मांडवी खुर्द, सांगरुण, रुळे, खानापूर या गावांच्या हद्दीलगत आता नव्यानेच बांधकामे, भराव टाकून अतिक्रमणे केली जात आहेत. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत गेल्या तीन-चार दिवसांत शेकडो ट्रक माती, राडारोडा टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकारामुळे येथील स्थानिक नागरिक हतबल झाले असून, या बाबत तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एका सामाजिक संस्थेकडून गाळ काढण्याचे काम सुरूहोते. सुरुवातीला हे गाळ काढण्याचेच काम असावे असे स्थानिक लोकांना वाटले. मात्र माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या सांगण्यावरून हे काम होत असल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यांनी या प्रकाराबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत श्रीधर कलमाडी यांना पाटबंधारे खात्याने नोटीस बजावली आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पिढ्यान्पिढ्या काही शेतकरी तलाव-शेती (गाळपेर) करून आपली उपजीविका करत आहेत. शेती करण्याची शेतकऱ्यांची ही कृती अतिक्रमण ठरत नाही. ते पाटबंधारे विभागाकडे आपला मालकीहक्क दाखविण्यासाठीही कधी हट्टही धरत नाहीत. केवळ नदीपात्र खोल गेल्यानंतर हंगामी शेती करण्याची पारंपरिक पद्धत ते अवलंबित असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाहेरच्या नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाणलोट क्षेत्रातील जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांत व पाटबंधारे खात्यात आता वेगळाच वाद निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.४श्रीधर कलमाडी यांना नोटीस पाठवून या प्रकाराबाबत विचारणा केली आहे. धरणक्षेत्रात त्यांची शेतजमीन व गेस्ट हाऊस असून, पूर्वीच त्यांनी शेतीसाठी पाणी उचलण्याचा परवानाही घेतला आहे. आता त्याच परिसरात हा भराव टाकण्यात येत आहे. चौकशीत अतिक्रमणाचा हा प्रकार सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कलमाडी यांच्या भावाला पाटबंधारे खात्याची नोटीस
By admin | Published: May 31, 2015 1:21 AM