बारामती : विमानतळावरील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अँकेडमी वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे सातत्याने होणारे अपघाताच्या पार्श्वभुमीवर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने कारवाइचा बडगा उगारला आहे. संस्थेचे देशभरातील कामकाज तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ‘डीजीसीए’चे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत.
टेक्नम पी २००८ जे या विमानाचाअपघात झाल्याची नोंद घेत ‘डीजीसीए’ या संदर्भात कंपनीला ईमेल पाठवून तातडीने कामकाज निलंबित करत असल्याचे नमुद केले आहे. या बाबत पाठविलेल्या ईमेलनुसार , रेडबर्ड या अँकेडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती यामुळे हे अपघात घडले आहेत. डीजीसीए ‘रेड बर्ड’ संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार तपासले जाणार आहे. या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बारामतीत अवघ्या तीन दिवसात रेड बर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाले आहेत. या अपघातात तीन जण जखमी झाले होते, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नव्हती.त्याची डीजीसीए ने गंभीर दखल घेतली आहे.दरम्यान,दोन अपघात झाल्यानंतरही रेडबर्डच्या कोणत्याही प्रतिनिधीने या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
रस्त्यावरील अपघाताप्रमाणे तीन दिवसांत शिकाऊ विमानाचे दोन अपघात झाले.त्यानंतर या परीसरात भीतीचे वातावरण आहे.पोलीसांनी देखील याबाबत ‘डीजीसीए’ला संपर्क साधल्याचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोइटे यांनी सांगितले.त्यामुळे ‘डीजीसीए’ कडुन याबाबत येणाऱ्या अहवालाची पोलीसांना प्रतिक्षा आहे.पोलीस देखील याच अहवालानंतर कारवाइ करणार आहे.