हडपसर : ज्येष्ठांच्या हातांच्या बोटांचे ठसे घासले गेल्याने त्यांचे आधार कार्ड तयार होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याने हडपसर येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सातव यांनी थेट पंतप्रधान, केंद्र सरकारचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री, राज्य सरकारचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांना नोटीस दिली आहे.सरकार आधार कार्ड अनेक महत्त्वाच्या योजनांना जोडण्याची सक्ती करीत आहे, तर दुसरीकडे काही ज्येष्ठांच्या हातांच्या बोटांचे ठसे घासले गेल्याने त्यांचे आधार कार्ड होत नाही. त्यामुळे कार्ड काढण्याची इच्छा असतानाही गुळगुळीत झालेल्या बोटांमुळे आधार कार्ड न मिळणाºया ज्येष्ठांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.हडपसरमध्ये आधार कार्ड काढण्याची केंद्रे सुरू झाल्यानंतर गेल्या चार वर्षांत चार वेळा विविध आधार केंद्रांवर सर्व आवश्यक कागदपत्रे देऊन आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न सातव यांनी केला. त्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे (फिंंगर प्रिंंट) स्पष्ट येत नसल्याने त्यांना कार्ड अद्याप मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना इनकम टॅक्स भरताना व बँकेत व्यवहार करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड निघत नसल्याने व्यवहारात वारंवार होणाºया त्रासाला कंटाळून सातव यांनी किरण कदम या वकिलांमार्फत नोटीस दिली.सातव म्हणाले, की चार वर्षांपूर्वी हडपसर येथील आधार कार्ड केंद्रावर आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म भरून दिला. त्यानंतर फिंंगर प्रिंंट देण्यासाठी मशिनवर हात ठेवले; परंतु त्यावर ठसे आलेच नाहीत. फिंगर प्रिंट येत नसल्याने आधार कार्ड मिळणार नाही, असे सांगून त्या केंद्रचालकाने मला जायला सांगितले. चार वर्षांत पुन्हा चार वेळा वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कार्ड काढण्याचा प्रयत्न केला; मात्र डाव्या आणि उजव्या हाताच्या दोन बोटांचे ठसे येत नाहीत.
ठशांमुळे आधार कार्ड बनविण्यास समस्या, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:27 AM