पुणे : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. ज्या प्रकरणाविषयी त्या बोलत आहेत, त्यात मला अटकपूर्व जामीन मंजूर आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना माझ्यावर आरोप करून चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत. यामुळे त्यांच्यावर मी १० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत असून, तशी नोटीस मी दिली असल्याचे शिवसेना कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांनी सांगितले. ॲड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत ११ एप्रिल रोजी त्यांनी नोटीस पाठविली.
गुन्हा दाखल झाल्यावर चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर हल्लाबोल केला होता. कुचिक यांना जामीन देण्यावरही त्यांनी सवाल उठवला होता. याबाबत पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. कुचिक व संबंधित तरुणीमधील दूरध्वनीवरील संवाद त्यांनी पुढे आणत राज्य सरकारवर आरोप केले होते.
याबाबत कुचिक यांचे वकील ॲड. हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘चित्रा वाघ यांच्या आरोपामुळे कुचिक यांची बदनामी झाली आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. जवळपास १० कोटींचा हा दावा आहे.’ दरम्यान, चित्रा वाघ यांनीही ही नोटीस मिळाल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. मला या प्रकरणात कसे अडकवले जाईल, अशी खलबते राज्य सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले. भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी यावेळी विचारला, तसेच अशा प्रकारे महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. पीडिताने केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या ब्लॅकमेल माफियावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी केली आहे. मी माझ्या मर्जीने गोव्याला गेेले होते, असा जबाब या पीडितेने मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले.