पुणे : बँकेत प्रलंबित असलेल्या प्रकरणात ग्राहकाने नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ केल्यास त्याला थेट व्हॉट्अअॅपद्वारे पाठवलेली नोटीस आता ग्राह्य धरली जाणार असल्याची शक्यता आहे. व्हॉट्अअॅपद्वारे पाठवलेली नुकतीच एक नोटीस न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) कार्ड्स अँड पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व एका खातेधारकाच्या वादा प्रकरणात खातेदार नोटीस स्वीकारणे टाळत होते. त्यामुळे कंपनीची व्हॉट्स अॅप नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. न्यायालयीन प्रकरणांत असे क्वचितच घडते. त्यामुळे आता यापुढील काळात देखील अशा प्रकारच्या नोटीस वैध ठरविण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीच्या अर्जानुसार, एका वादासंदर्भात खातेदार हे कंपनीच्या अधिका-यांचे दूरध्वनी कॉल घेण्यास आणि त्यांना भेटण्यासही टाळाटाळ करत होते. त्यामुळे कंपनीच्या अधिका-याने त्यांना ८ जून रोजी व्हॉट्स अॅपवर पीडीएफ स्वरूपात नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीत खातेदारांना सुनावणीच्या पुढील तारखेची माहिती देण्यात आली होती. तरीही जाधव यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीला उच्च न्यायालयात अर्ज करावा लागला. या अर्जावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर त्यांनी व्हॉट्स अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीने पाठवलेली नोटीस ग्राह्य धरली. अखेरीस आवश्यकता भासल्यास खातेदाराच्याविरुद्ध वॉरंट जारी करता यावे, यासाठी कंपनीने त्यांचा निवासी पत्ता सादर करावा, असे निर्देश देऊन खंडपीठाने सुनावणी तहकूब केली. दरम्यान प्रतिवादी खातेदार हे नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे कागदपत्रांमधून दिसत आहे. त्यामुळे कंपनीने व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे. त्यामुळे दिवाणी संहिता प्रक्रियेतील तरतुदींनुसार ही नोटीस ग्राह्य धरत आहे, असे न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले आहे. भाडेकराराच्या आधारे बँकेत खाते उघडण्याची सुविधा सध्या सर्वच बँकांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती या कराराच्या आधारे बँकेत खाते काढतात. त्यावेळी दिलेला पत्ता आणि मोबाइल नंबर कालांंतराने बदलतो. मात्र दरम्यानच्या काळात खातेदाराने कर्जाचे प्रकरण करून त्याची परतफेड करणे अशक्य झाल्यास खातेदाराला संपर्क करणे अवघड होते. त्यामुळे व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवने बँकेच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेली नोटीस न्यायालयाने ठरवली वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 7:23 PM
पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे.त्यामुळे.....
ठळक मुद्देखातेदार हे कंपनीच्या अधिका-यांचे दूरध्वनी कॉल घेण्यास आणि त्यांना भेटण्यासही टाळाटाळ व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवने बँकेच्या दृष्टीने सोयीस्कर होणार