बारामती (पुणे) : बारामतीतील बेकायदेशीर कत्तलखाने काढण्यात यावेत यासाठी दोनवेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कारवाई न केल्याने मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व तहसिलदार विजय पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बारामती येथील करा नदीपात्रामधील ७-८ अनधिकृत कत्तलखाने पत्र्याचे शेड व बांधकाम कारवाई करून ताबडतोब तोडण्याबाबत. १६ मार्च २०१९ व १३ जुलै २०२१ रोजी लेखी निवेदन देऊन सुद्धा नगर परिषदेकडून या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई झाली नाही. सन २०१९ पासून आजपर्यंत गुन्हे नोंद होत असताना प्रत्यक्ष बारामती नगरपालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही.
येथे बारामती, अकलुज, भिगवण या तालुक्यातून हजारोंच्या संख्येत गाई वासरे, कत्तलीसाठी आणली जातात. गोमांस स्थानिक आणि मुंबई, पुणे येथे विक्री केले. त्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही. महाराष्ट्र प्राण संरक्षण अधिनियम १९९५ नुसार सन २०१५ पासून संपूर्ण गोवंश म्हणजे गाई-बैल-वासरू वळू यांच्या कत्तलीला बंदी घातलेली आहे, मात्र बेकायदेशीर कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कारवाईवरून पाडून टाकावे, अन्यथा न्यायालयामध्ये कायदेशीर कारवाई कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नोटिसीमध्ये देण्यात आला आहे.