बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक कामकाज प्रशिक्षणासाठी गैरहजर राहणाऱ्या ६५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावलेल्या या कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर खुलासा सादर करावा लागणार आहे. समाधानकारक खुलासा न झाल्यास या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक कामकाजासाठी विविध खात्यांमधील ६३० कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, या प्रशिक्षणासाठी ६५ कर्मचाऱ्यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित शासकीय कार्यालयाचे नाव आणि गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे- तालुका कृषी अधिकारी ९, कोतवाल - ९, ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई - १३, नगरपरिषद - २, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- ३, पाटबंधारे खाते - २, भूमिअभिलेख कार्यालय - ३, सार्वजनिक बांधकाम विभाग - ५, देखरेख संघ - १, सहकार खाते - १, शिक्षक - ७, वनविभागाच्या - ३ कर्मचाऱ्यांचा गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.
निवडणूक कामकाज प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या ६५ कर्मचा-यांना नोटिसा
By admin | Published: April 20, 2015 4:23 AM