पुणे : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना बोलून काही होणार नाही. कारण त्या काहीही करू शकणार नाहीत. नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी आहे. आपली बाजू मांडण्याचं सोशल मीडिया हे एक चांगलं माध्यम आहे. पण प्रत्यक्षात कृतीही झाली पाहिजे. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याजवळ अधिकार आहेत. संबंधित व्यक्तीला त्या समोरासमोर जाऊन बोलू शकतात. परंतु त्या तसं करत नाहीत. असे म्हणत करुणा धनंजय मुंडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
करुणा मुंडे म्हणाल्या, दिशा सालीयन, पूजा चव्हाण, करुणा धनंजय मुंडे या महिलांसोबत महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पाहिले. प्रश्न या तीन महिलांचाच नाही तर आजही महाराष्ट्रात अनेक महिलांसोबत अत्याचार होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महिला असताना याबाबत एकही महिला आवाज उठवत नाही. मी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा एकाही महिलेने आवाज उठवला नाही. फक्त चित्रा वाघ यांनी माझ्यासाठी आवाज उठवला होता. परंतु तो ही फक्त मीडियापुरता. मी याला पब्लिसिटी स्टंट समजते. त्यांनी त्या मंत्र्याविरोधात आवाज उठवला असता तर त्या खऱ्या वाटल्या असत्या.
तरच शक्ती कायदा खरा ठरेल
उद्धव ठाकरे जेव्हा शक्ती कायद्यानुसार संजय राठोड विरोधात गुन्हा दाखल करतील तेव्हाच हा कायदा खरा ठरेल. संजय राठोड विरोधात पुरावे असल्याचं सर्वांना माहीत आहे. तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे जेव्हा संजय राठोड वर कारवाई करतील तेव्हा राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात आहे याची खात्री पटेल. असंही करूना मुंडे म्हणाल्या.