वाघोली/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज (२३ डिसेंबर) रोजी २३ गावे पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना निघाली असल्याने २३ गावांचा पुणे महापालिकेतील समावेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हरकती व सूचना विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर वाघोलीसह म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकीटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी ही गावे महापालिकेत समविष्ट होणार आहेत. २३ गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द ४५० चौ. कि. मी. होणार असून क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे.
***********************
वाघोलीचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार असल्यामुळे वाघोलीच्या विकासाला चालना मिळणार आहे , गेल्या अनेक दिवसापासून वाघोली पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट होण्याबाबत मागणी होती त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे यश आले आहे. पुढील काळात नक्कीच पुणे महानगरपालिका मुळे वाघोलीच्या विकासाला अधिक गती मिळेल .
- अशोक पवार,(आमदार शिरूर हवेली)