लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ हा तडीपार असताना त्याने भिगवण परिसरात गुन्हा केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ॲक्टिव्हिटी (एमपीडीए) नुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. त्याला स्थानबद्ध करून त्याची येरवडा कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली.
नीलेश घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अपहरण, असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. या गुन्ह्यात २०२० मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर ही त्याने भिगवण परिसरात खंडणी व अपहरण केल्याचा गुन्हा केला. त्यामुळे त्याच्या विरोधात एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी घायवळ याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यास परवानगी दिली. त्यानुसार घायवळ याला जामखेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.
पुणे ग्रामीणमध्ये गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षात १७ टोळ्यातील ५५ जणांस तडीपार करण्यात आले आहे. तर चार टोळ्यांतील ३१ जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. १२ टोळ्यातील ६५ जणांकडून चांगल्या वर्तणूकीचे हमीपत्र लिहून घेतले आहे, असे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
पप्पू गावडे खून प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार
लवळे परिसरात पप्पू ऊर्फ संतोष गावडे खून प्रकरणात कुख्यात गजानन मारणे याची निर्दोष सुटका झाली आहे. ही घटना ३ नोव्हेबर २०१४ घडली होती. यामध्ये साक्षीदार फितूर झाल्याचे दिसून आले आहे. मात्र इतर पुरावे भक्कम आहेत. त्यामुळे या खटल्यात उच्च न्यायालयात जाण्यासाठी शासनाकडे परवानगी मागणार आहोत. परवानगी मिळाल्यास हायकोर्टात अपील केले जाईल, असे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.