जिला नाही ...तिच्यासाठी ते माहेर असावं!
किती सुंदर शब्दांत एका स्त्रीच्या आयुष्यात मैत्री का महत्त्वाची आहे, हे लेखिका गौरी नवरे यांनी मांडले आहे. मैत्रीवरच्या सुरेख कवितेनेच सुरू होणारी ही कादंबरी मैत्री कुठल्या पातळीवर घेऊन जाणार याची जाणीव करून देते. पुस्तक हातात घेतल्याघेतल्या मन प्रफुल्लित होतं, ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर पहिल्या दोन-चार पानांतच या मुखपृष्ठाचे महत्त्व लक्षात येते. त्यात वर्णन केलेली सगळ्यात महत्त्वाची वास्तू, हीच मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आली आहे. पिवळा रंग हा मैत्रीचा रंग मानला जातो आणि बरोब्बर तोच रंग मुखपृष्ठासाठी वापरलेला दिसून येतो. कथानकाच्या पात्रांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या आणि त्यांच्या राहणीमानाच्या अनुषंगाने अभय बोरकर यांनी मुखपृष्ठ साकारले आहे.
कॉलेजमध्ये अनपेक्षितपणे घडलेल्या एका घटनेमुळे जवळ येत गेलेल्या या तिघी; तेजू, मनू आणि पीयू. स्वभावाने, विचाराने भिन्न तरीही एकमेकींच्या हाताला घट्ट धरून त्या आयुष्याचा प्रवास एकत्र करतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेल्या सुखात, दुःखात एकमेकींना साथ देताना त्या स्वतःपेक्षा बाकीच्या दोघींचा जास्त विचार करताना दिसतात. एकमेकींबद्दल कौतुक, अभिमान तर त्यांना आहेच पण वेळप्रसंगी कान धरून चुका दाखवायला पण त्या मागे-पुढे पाहत नाहीत.
नोकरीच्या, कामाच्या व्यापात गुंतल्यावरसुद्धा एकमेकींना वेळ देणे आणि प्रत्येक निर्णयात ‘आम्ही आहोत’ हे बाकीच्या दोघींनी कृतीतून दाखवून देणे हे या मैत्रीचे वैशिष्ट्य.
या मैत्रीतील भावलेली गोष्ट म्हणजे एकमेकींना तेवढेच स्वातंत्र्य देणे. कितीही चांगली मैत्री असली तरी आपले निर्णय एकमेकांवर ना? लादणे, दुसऱ्याचा निर्णय समजून घेऊन त्याचा आदर करणे हे किती महत्त्वाचे ना? एकमेकींच्या घरातले मृत्यू, प्रेमभंग असे अवघड प्रसंग पेलायला ही मैत्रीच त्यांचा आधारस्तंभ बनते, तर आनंदाच्या प्रसंगात तो बहरायलाही मैत्रीच हात पुढे करते. स्त्रीची मैत्री ही तिचा साथीदार कसा असेल यावर पुढे टिकते. इथे तिघींचे साथीदार त्यांना साथ देत त्यांची मैत्री समजून घेतात, हे खूप महत्त्वाचे आहे.
लेखिकेच्या सहज-साध्या शब्दांत ही कादंबरी विस्तारत असताना हिंदी गाण्यांची गुंफण पण सहजरीत्या केल्यासारखी वाटते. प्रत्येक प्रसंगानुसार केलेली गाण्यांची निवड अगदी समर्पक वाटते. तसेच इंग्रजी भाषेचा ओघवता वापर पण जाणवतो. आधुनिक काळातील तिघी म्हणून त्यांचे संवाद इंग्रजीमध्ये आवश्यक आहेत का? असे एखाद्याला वाटू शकते. पण मुंबईसारख्या शहराच्या पार्श्वभूमीवर रंगणारे कथानक, उच्चशिक्षित पात्र आणि आजच्या काळातलं एकूणच वातावरण या सगळ्याला तेही सहज वाटते.
४९० पानांचे पुस्तक ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नांत लिहिण्याचे शिवधनुष्य लेखिकेने नक्कीच यशस्वीरीत्या पेलले आहे. यामागे दांडगे वाचन, त्यामुळे आलेले भाषेवर असलेले प्रभुत्व जाणवते. लेखिकेची लेखन शैली अगदी आपल्या जवळची वाटते. पुस्तक वाचत असताना उत्सुकता तर वाढतेच आणि तिघींच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगात आपण कधी गुंतून जातो आणि त्या कधी आपल्या आजूबाजूलाच वावरत असल्याचा भास आपल्या मनात निर्माण होत जातो कळत नाही. ‘मी तुमच्या दोघींशिवाय जगू शकणार नाही,’ असं एकमेकींना सांगणाऱ्या या तिघींच्या आयुष्यात जर खरंच तसा प्रसंग उभा राहिला तर काय होईल?, हा प्रश्न त्यांच्या आसपासच्या लोकांनाच काय आपल्यालाही भेडसावून जातो. खरंच असं मैत्रिणींच्या बाबतीत होऊ शकतं का? जाणून घेण्यासाठी जरूर वाचा ‘त्या तिघी’. या कादंबरीत प्रत्येकाला आपले मैत्र सापडेल, अशी मला खात्री आहे.
अश्विनी काशीकर