पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयास बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये, इच्छित ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय टळण्यास मदत हाेईल.
बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेकवेळा महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली, पत्त्यात बदल, स्थलांतर, शाखा बदल, बाेर्ड बदल तसेच वैद्यकीय कारणास्तव ते राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्यासाठी विद्यार्थी अर्ज करतात किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी ती मागणी याेग्यही असते.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत राहून बारावीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालयाच्या स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार हा बदल केला जाईल. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून घ्यावी, असे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बारावीसाठी महाविद्यालय बदलण्याचा अर्ज आल्यावर त्यावर प्रक्रिया करताना त्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत कोणतीही अनियमितता राहणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेणे गरजेचे आहे, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले आहेत.