आता तीन पक्षांची बांधली गेली मोट; महापालिकेत यापेक्षा मोठा धक्का भाजपला देऊ - मोहन जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:47 PM2023-03-02T19:47:55+5:302023-03-02T19:48:04+5:30
भाजपने ज्या पद्धतीने या निवडणुकीकरता ताकद लावली, तीच त्यांना कमकुवत करणारी ठरली
पुणे: सलग २८-२९ वर्ष कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. तो काढून घेणे सोपे काम नव्हते. भाजपच्या अतिरेकी प्रचाराने ते सोपे केलेच, पण त्याबरोबरच तीनही पक्षांनी दाखवलेली एकजूट यात महत्वाची होती, आता महापालिका निवडणुकीत यापेक्षा मोठा धक्का आम्ही भाजपला देऊ असा विश्वास महाविकास आघाडीच्या प्रचाराचे या मतदारसंघात नियोजन करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. जोशी काँग्रेसचे लोकसभेसाठीचे पुण्यातील उमेदवार होते. त्यामुळे काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे त्यांच्याकडे या निवडणुकीचे नेतृत्व आले. धंगेकर यांचे नाव काँग्रेसकडून तातडीने निश्चित होण्यामागे जोशी यांचेच प्रयत्न होते. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली, त्याचवेळी भाजपने हाय खाल्ली असे जोशी म्हणाले.
प्रचारासाठी तीनही पक्षाची एकत्रित मोट बांधणे कठीण होते. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र काम केल्यामुळे ते शक्य झाले. प्रत्यक्ष प्रचारात नेत्यांचे नियोजन करणे, त्यांना प्रभाग, परिसर, याची आखणी करून देणे, राज्यस्तरावरील नेत्यांचे दौैरे ठरवणे, त्यांच्या मेळावे, सभांचे ठिकाण ठरवणे या सर्व गोष्टी करताना पुण्यातून पूर्वी निवडणूक लढवण्याचा अनुभव कामी आला. त्यातच उमेदवार धंगेकर यांनी यापुर्वी दोन वेळा याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याचाही उपयोग झाला असे जोशी यांनी सांगितले.
पोटनिवडणुक होती, भाजपने ज्या पद्धतीने या निवडणुकीकरता ताकद लावली, तीच त्यांना कमकुवत करणारी ठरली. उपमुख्यमंत्री १० वेळा, मुख्यमंत्री मतदारसंघात मुक्कामाला, केंद्रीय गृहमंत्री उमेदवाराच्या भेटीला व प्रचाराच्या नियोजनाला हा सगळा प्रकार भाजपने इर्ष्येस पेटून केला. तोच त्यांचा घात करणारा ठरला. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने अतीशय व्यवस्थित नियोजन केले. असलेली ताकद नेमक्या ठिकाणीच वापरली. त्याचाच आघाडीला फायदा झाला. भाजपने इतकी तगडी फौज उतरवलेली असताना ११ हजार मतांनी विजय ही सोपी गोष्ट नाही. आम्ही सर्वजण ही निवडणूक आमची नाही तर मतदारांची करण्यात यशस्वी झालो असे जोशी म्हणाले. महापालिका निवडणुकीसाठीही आमचे असेच नियोजन असेल. सर्वजण एकमताने प्रयत्न करतील. मागची ५ वर्षे त्यांनी केलेला शहराचा कारभार हाच आमचा प्रमुख मुद्दा असेल. त्यातूनच आम्ही महापालिका निवडणूकीत त्यांना यापेक्षा मोठा धक्का देऊ असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.