आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:16 AM2024-10-08T00:16:08+5:302024-10-08T00:17:29+5:30
अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली.
बारामती दि. ७ (प्रतिनिधी) : "विकासाच्या मागे उभे राहायचं का भावनिक व्हायचंय, याचा निर्णय बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे. निवडणुकीच्या काळात अनेकजण येतील मते मागण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा तो अधिकार आहे. भावनिक करण्याचा देखील प्रयत्न करतील," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली.
बारामती शहरात आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते. लोकसभेत भावनिकतेचा मुद्दा गाजला होता. आता तो विधानसभेत देखील गाजण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले. ते पुढे म्हणाले,बारामतीचा सर्वांगीण विकास कोणी केला, आदरणीय पवारसाहेबांनी कामाला सुरुवात केली यात कोणाचं दुमत असण्याचे कारण नाही. कारण १९६७ पासून ‘साहेबां’नी शहर आणि तालुक्याचे नेतृत्व केले. १९६७ पासून ‘साहेब’ आमदार झाले. १९९१ पासून बारामतीकरांना मला आमदारकीची संधी दिली. बारामतीकरांनी साथ दिल्याने राज्यात विविध पदे भुषविणे शक्य झाले. प्रशासनावर पकड मिळविणे शक्य झाल्याचे पवार म्हणाले.
"मला आठवतंय मी लहान होतो, शाळेत होतो. विद्या प्रतिष्ठानची पहिली इंग्लिश मीडियम शाळा सुरु करताना लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ‘साहेब’ स्वत: व्यापारपेठेत फिरले. त्यानंतर कन्याशाळा बांधताना कदाचित लोकवर्गणी गोळा केली असेल. मात्र, मी १९९० ला सुरुवात केल्यानंतर कोणालाही वर्गणी मागितली नसल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
"पूर्वी पवारांकडून जेवणं मिळायची नाही, काहीच मिळायचं नाही, पवार भेटायला पण येत नव्हती. पण आता घमेलं पण वाटलीत, क़ुठे काहीतरी झालं तर मी कधीतरी भेटायचो, आता साड्या मिळायला लागल्या, हितगुज करायला लागले. डबे,घमेले वाटायला लागले. आता घमेले घेवून केळेवाली गंगु कुठे केळे विकायला चालली का, तेच समजेना अशी मिश्कील टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानिमित्ताने पवारं यायला लागली हे बरं झालं. सारखी नुसतीच मते घ्यायची, घरी भेटायला यायची नाही. ओळख दाखवायची नाहीत. आता नाव माहिती नसले तरी मी ओळखते तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवार सुद्धा हसायला लागला आहे. ठीकंय बारामतीकरांना समाधान मिळतंय ना, मिळंतय तर घ्या सोडू नका, पण घडाळाचं बटण दाबायला विसरु नका," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली.