पुणे :शहर संघटनेत आलेली मरगळ, विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीतही पक्षाची झालेली हाराकिरी बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकीसाठी पुणे शहर संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे मनसेच्या नेतेपदी माजी गटनेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
सध्या शहरातून अनिल शिदोरे आणि दीपक पायगुडे असे दोन नेतेपदी असताना वागस्कर यांची झालेली निवड भुवया उंचावणारी ठरली आहे. कार्यकर्त्यांपासून थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोच असणाऱ्या वागस्करांची निवड पक्षात चैतन्य निर्माण करेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. दरम्यान वागस्कर यांनी २००७ ते २०१७ अशी दहा वर्षे मनसेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे. याकाळात त्यांनी महापालिका गटनेतेपदाची भूमिकाही निभावली आहे. त्यांच्या पत्नी वनिता यादेखील नगरसेविका म्ह्णून कार्यरत होत्या.
याबाबत वागस्कर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, वर्षानुवर्षे प्रामाणिक काम केल्यामुळे मला ठाकरे यांच्यासोबतच्या फळीत काम करण्याची संधी मिळाली आहे असे मी मानतो.सगळीच कामे खळ्ळखट्याकने होत नाहीत, काही कामे अभ्यासाने केली जातील.जनतेला नाव ठेवण्यास जागा उरणार नाही असे काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.