पुणे : ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार आणि पर्यावरण अभ्यासक, लेखक अतुल देऊळगावकर यांच्या संवादातून उलगडलेल्या विश्वाचे ग्रंथरूप 'बोलिले जे-संवाद एलकुंचवारांशी' या पुस्तकातून उलगडणार आहे. नाटक म्हणजे काय, अनुभवाचे रुपांतर अभिव्यक्तीमध्ये कसे होते असे नानाविध पैलू जाणून घेणार आहेत.
अतुल देऊळगावकर म्हणाले, 'श्रेष्ठ लेखक, नाटककार महेश एलकुंचवार यांनी नुकतीच वयाची ऐंशी पूर्ण करून 81 व्या वर्षात पदार्पण केले. एलकुंचवार सरांनी आपल्याला किती प्रकारे समृद्ध केले आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. १९८५ साली 'वाडा चिरेबंदी', १९८८ साली 'मग्न तळ्याकाठी' आणि १९९१ मध्ये 'युगांत' हा समृद्ध खजिना एलकुंचवार सरांकडून रंगभूमीला मिळाला. त्यांची तीन नाटके सलग सादर करण्याचे श्रेय चंद्रकांत कुलकर्णी यांना जाते. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला आहे. त्या नाटकांची मोहिनी आज ३० वर्षांनंतरही कायम आहे. मध्यमवर्ग आत्ममग्न होऊ लागला, संवाद संपुष्टात येऊ लागला आहे, हे 'वाडा चिरेबंदी' नाटकातून, जिव्हाळा आटत चालला आहे त्याप्रमाणे निसर्गही आटत चालला आहे हे 'मग्न तळ्याकाठी',मानवी नाते आणि निसर्ग दोन्ही वैराण होत आहे, हे वास्तव 'युगांत' या नाटकातून एलकुंचवार सरांनी दाखवून दिले.'
'हवामानबदलाची संकल्पनाच १९९० मध्ये आली. पहिली परिषद आणि त्याचा अहवालाच पहिल्यांदा १९९१ मध्ये आला. निसर्गबदल एलकुंचवार सरांना तेव्हाच कसा दिसला असेल? भौतिकशास्त्रज्ञ प्रीमन डायसन म्हणायचे की, वैज्ञानिक, कलावंत आणि तत्वज्ञ वेगवेगळ्या मार्गानी जातात; मात्र, एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचतात. मात्र, आपण वैज्ञानिकांना जेवढे गांभीर्याने घेतो, तेवढे कलावंताना घेतो का? याचा मागोवा घेण्यासाठी मी जून, जुलैमध्ये सरांच्या फेसबूकवर दोन प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतींचे पुस्तकरूप साकारले आहे', असेही देऊळगावकर यांनी सांगितले.
मनोविकास प्रकाशनातर्फे त्यांच्या फेसबुक पेजवर16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ व रचना केलेली आहे. या पुस्तकातून सरांकडून एकंदरीत आपल्याला नाट्य प्रक्रिया कशी होते आणि अनुभवाचे रूपांतर अभिव्यक्तीमध्ये कसे होते, याविषयी जाणून घेता येणार आहे. १९९१ नंतर केलेले ललित लेखन, संस्कृतीचे संचित ते कोणत्या दृष्टीने पाहतात ,याविषयी व्यक्त झाले आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. या निमित्ताने अतुल पेठे आणि गजानन परांजपे पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करणार आहेत.