पुणे : नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाच्या नामकरण कार्यक्रमात, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पाऊस आला. मात्र त्यांनी आपले भाषण चालू ठेवले.
सातारा येथील भाषणादरम्यान पाऊस आला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपले भाषण चालू ठेवले होते. त्यांच्या या भाषणाची व कार्यक्रमाची राज्यात सर्वदूर चर्चा झाली. त्याचप्रमाणे आज चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम सुरू असताना पाऊस आला म्हणून भाषण न थांबविता ते पुढे चालू ठेवले.
रविवारी सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण पाटील यांच्या हस्ते, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले. परंतु भाषण मध्येच न थांबता पाटील यांनी सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.