पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रात मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भर उन्हात देखील मतदारांचा उत्साह कायम होता. जिल्ह्यात सरासरी ६२.५ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (दि. १५) होणाऱ्या मत मोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्यातील २१ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून, ३०८ उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. वाढलेले मतदान नक्की प्रस्थापितांच्या विरोधात जाणार की, अन्य काही पर्याय समोर येतात याबाबत आता खल सुरु झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मतदारांनी देखील तितक्याच उत्साहाने अपले कर्तव्य बजावत भरगोस मतदान केले. बहुतांश मतदारसंघात पंचरंगी लढत असल्याने मतांचे धु्रवीकरण होऊन धक्कादयक निकाल हाती येतील असे भाकीत वर्तविण्यात येत होते. तसेच लढती देखील चुरशीच्या होतील असा अंदाज होता. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा चकवा देत निकालाच्या अंदाजाचा पुर्नविचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघाची टक्केवारी ५४.४४ टक्के होती. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५७.४२ टक्के होती. रात्री उशीरा हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारी नुसार जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान झाले होते. (प्रतिनिधी)
आता लक्ष मतमोजणीकडे
By admin | Published: October 16, 2014 6:08 AM