पुणे : मी आजही विद्यार्थी आहे आणि आपण नेहमी याच भूमिकेत असायला हवे. अध्यापक तोच असतो, जो नेहमी अध्ययन करीत असतो. माझी या सन्मानासाठी निवड होणे यात मला विशेष आनंद आहे. कारण आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय झाले आहेत, ही भावना आहे, 95 वर्षांच्या डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांची.शब्दसृष्टि या भारतीय साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना ‘डॉ. विजया स्मृती जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अकरा हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राम ताकवले, डॉ. रामजी तिवारी तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. डॉ मनोहर, डॉ. गजानन चव्हाण उपस्थित होते. यावेळी हिंदी-मराठी द्वैभाषिक पत्रिका ‘शब्दसृष्टि’च्या मीडिया विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी ‘आता माझी ही अवस्था मानधन स्वीकारण्याची नाही, देण्याची आहे. ही रक्कम संस्थेने सहयोग राशी म्हणून स्वीकारावी असे सांगितले. डॉ. राम तिवारी म्हणाले, डॉ. दीक्षित माझेही गुरू आहेत. त्यांच्याबददल मी काय बोलावे? ज्याप्रमाणे नदीतील जल घेऊन त्याचेच अर्घ्य त्याला व सूर्याला अर्पण करतात, तशीच माझी काहीशी भावना आहे. त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानामुळेच मी येथे व्यक्त होऊ शकत आहे. डॉ. राम ताकवले म्हणाले, मीडियाचा वापर फक्त सूचना, मनोरंजन यापुरताच मर्यादित नसून, याद्वारे उत्पादन व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. विचार व कल्पनांसाठी यात भरपूर वाव आहे. याचा विवेकपूर्ण विचार झाला पाहिजे. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी 95 व्या वर्षी सुद्धा कार्यरत राहाणारे डॉ. दीक्षित हे आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.मीडिया विशेषंकाचे अतिथी संपादक डॉ. सुनील देवधर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य मुकुंद आंधळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अनिल गायकवाड यांनी आभार मानले.----------------------------------------------------------------------------------------------------------
आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय : डॉ. आनंदप्रकाश दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:48 PM
‘आता माझी ही अवस्था मानधन स्वीकारण्याची नाही, देण्याची आहे.
ठळक मुद्देडॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना ‘डॉ. विजया स्मृती जीवनगौरव सन्मान’ प्रदान